भाजप शहराध्यक्षपदासाठी बिडकर, भिमाले, शिळमकर यांची नावे आघाडीवर   

निवड प्रक्रिया पुर्ण

पुणे: भाजपमध्ये सध्या संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. केंद्रापासून ते स्थानिक पातळीवर भाजपमध्ये संघटनात्मक फेर बदलाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर रविवारी पुण्यातील शहराध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या मतदान प्रक्रियेमध्ये पुणे भाजपमधून काही नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर आणि राजेंद्र शिळमकर यांच्या नावांची चर्चा आहे,
 
पुणे शहर भाजपचा नवीन शहराध्यक्ष निवडण्यासाठी काल पक्षाच्या पदाधिकार्‍यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. यामध्ये भाजप प्रदेशाकडून पाठविण्यात आलेल्या पर्यवेक्षक धनंजय महाडिक आणि निरीक्षक शेखर इनामदार यांच्याकडून  पदाधिकार्‍यांकडून शहराध्यक्षपदासाठी योग्य असलेल्या तिघांची नावे विचारण्यात अली. या तीन मध्ये एक नाव महिलेचे असणे बंधनकारक होत. 
 
प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, शहरातील सर्व सरचिटणीस, महिला मोर्चा, युवा मोर्चा यासह अन्य मोर्चाचे शहराध्यक्ष, विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार अशा तब्बल ४० ते ५० पदाधिकार्‍यांनी नव्या शहराध्यक्षपदासाठी तीन नावे सुचवली आहेत. आता हा गोपनीय अहवाल पर्यवेक्षक आणि निरिक्षकांकडून प्रदेशाला सादर केला जाणार असून प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत या नावांवर चर्चा होऊन एका नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.
 
दरम्यान, काल सकाळपासूनच शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांनी मतदानाचा अधिकार असणार्‍या पदाधिकार्‍यांना, फोन तसेच मेसेज केल्याचे पाहायला मिळाले. आपण आत्तापर्यंत केलेले कार्य आपल्याला न मिळालेली संधी आणि आपल्याला का संधी द्यावी याबाबतचे संदेश मतदानाचा अधिकार असणार्‍या पदाधिकार्‍यांना इच्छुकांकडून पाठवण्यात आले होते.
 
काल झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये शहराध्यक्ष पदासाठी एक महिलेचे नाव देणे बंधनकारक होते. त्यामुळे माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांची नावे चर्चेत होती. सुरुवातीला शहराध्यक्ष म्हणून एका आमदाराची निवड होण्याची शक्यता होती, त्यामुळे आमदार हेमंत रासने आणि योगेश टिळेकर यांचे देखील नाव सुरुवातीला चर्चेत होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आमदार, खासदारांना शहराध्यक्षपद नको असा सूर आल्याने ही नाव मागे पडले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये सध्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळमकर, गणेश घोष, राजेश पांडे यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची प्रचंड चर्चा झाल्याचे देखील सांगितले जात आहे.  
 
गणेश बिडकर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौर्‍यावर असताना त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या, त्यामुळे आता पुण्याचा शहराध्यक्ष नेमका कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.

Related Articles